शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे अज्ञात समाजकंटकाने पाण्याच्या पाईपलाईनमध्ये विषारी थायमीट औषध टाकल्याने पपाईपलाईनमधून आलेले पाणी जनावरांनी पिल्याने तब्बल बारा म्हशींना विषबाधा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील प्रमोद साळुंके यांचा दुग्धव्यवसाय असून त्यांनी अनेक म्हशी पाळलेल्या असून जनावरांच्या गोठयासह घराला पाणीपुरवठा करण्यासाठी सामूहिक विहिरीवरून पाईपलाईन केलेली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक बारा म्हशींना ताप आल्याचे साळुंके यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सदर ठिकाणी येत जनावरांसह गोठ्याची पाहणी केली. त्यानंतर जनावरांच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी थायमीट औषध आल्याचे समोर आले. तर यावेळी घराला पाणी पुरवठा होणाऱ्या टाकीची पाहणी केली असता त्यामध्ये देखील विषारी थायमीट औषध असल्याचे व पाण्याचा उग्र वास येत असल्याचे आढळले. त्यामुळे अज्ञात समाजकंटकाने विहिरीवरील पाण्याच्या पाईपलाईनमध्ये विषारी थायमीट औषध टाकल्याचे समोर आले.
दरम्यान रांजणगाव गणपतीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोरक्ष सातकर, डॉ. श्रीधर शिंदे, डॉ. नितीन सोनवणे यांनी तातडीने सदर जनावरांवर योग्य उपचार करत म्हशींचे प्राण वाचवले. तर प्रमोद साळुंके यांच्या घरातील पाण्यामध्ये देखील विषारी थायमीट औषध असल्याने सर्व पाणी सोडून देत टाक्या व भांडी स्वच्छ करण्यात आली असल्याने अनर्थ टळला आहे. तर याबाबत प्रमोद साळुंखे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार देखील केली असल्याचे साळुंखे यांनी सांगितले आहे.