लोणी काळभोर (पुणे): हवेली तालुका नव्हे तर संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या थेऊर (Theur) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना (Yashwant sahakari sakhar karkhana) संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी शनिवारी चुरशीने मतदान झाले. एकूण एकवीस हजार मतदारांपैकी तब्बल अकरा हजार चारशेहून अधिक मतदारांनी सहा मतदान केंद्रांवर मतदान केले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या दोन्ही पॅनेलच्या चाळीस उमेदवारांच्यासह एकूण ५२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
“यशवंत” कर्जबाजारीपणामुळे मागील तेरा वर्षांपासून बंद असला तरी, कारखान्याची सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात यावी, यासाठी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व पुर्व हवेलीचे जेष्ठ नेते माधवअण्णा काळभोर (Madhav kalbhor) व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक प्रकाशदादा जगताप (Prakash Jagtap) या सहकार क्षेत्रातील दोन्ही दिग्गजांचे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने, उद्या (रविवारी) उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील महात्मा गांधी विद्यालयात होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे कागदोपत्री एकूण मतदार एकवीस हजारांहून अधिक असले तरी, त्यापैकी सहा ते साडेसहा मतदार मयत आहेत. यामुळे उरलेल्या चौदा ते साडेचौदा हजार मतदारांपैकी आज झालेल्या निवडणुकीत अकरा हजार चारशेहून अधिक मतदान झाल्याने ७५टक्के मतदान झाल्याची चर्चा आहे.
अण्णासाहेब मगर यांनी उभारलेल्या “यशवंत” कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक यापुर्वी 2006 साली झाली होती. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने आर्थिक अनियमतेतेचा ठपका ठेवत तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करुन कारखान्याचा कारभार प्रशासकाच्या हाती दिला होता. २०११ मध्ये तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर ही निवडणूक होण्यासाठी अनेक अडथळ्यांना पार करावे लागले आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर होत असलेल्या या निवडणुकीत हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल”, (Rayat Sahakar Panel), तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” (Shetakari Vikas Aghadi) या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूकडून एकमेकांवर अंत्यत टोकाच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने, सुरुवातीला दुर्लक्षित झालेली निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरसीची बनल्याचे दिसून आले.
दरम्यान उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात उद्या (रविवारी) सकाळी आठ वाजता मत मोजणीस प्रांरभ होणार आहे. मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून झाल्याने, सायंकाळी सहानंतरच सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान माधव काळभोर, दिलीप काळभोर व रोहिदास उंद्रे व त्यांच्या समर्थकांनी सर्वच्या सर्व एकवीस जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तर विरोधी पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर व बाळासाहेब चौधरी व त्यांच्या समर्थकांनी ब वर्गातील एक जागा वगळता सर्वच्या सर्व वीस जागा मोठ्या फरकाने जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
दोन्ही पॅनेल प्रमुख व निवडणूकीतील सर्व उमेदवारांनी आपले पॅनेल किंवा आपणच निवडून येण्याच्या वल्गना केल्या असल्या तरी रविवारी (दि. १० मार्च) रोजी मतमोजणी झाल्यानंतरच या सर्व चर्चांना पुर्णविराम मिळणार आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी चोख बंदोबस्त लावल्यामुळे, लोणी काळभोर व उरुळी कांचन मतदान केंद्रावर दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
किटली व कपबशीत टशन..
माधवअण्णा काळभोर (Madhav kalbhor) यांच्या रयत सहकार पॅनेलचे चिन्ह किटली होते. तर प्रकाश जगताप यांच्या शेतकरी विकास आघाडी पॅनेलचे चिन्ह कपबशी होते. मतदानस्थळी दोन्ही पॅनेलचे उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांना आपआपले चिन्ह सांगत त्यांना थेट केंद्रापर्यंत घेऊन जात होते. अनेक मतदारांचे वय जास्त असल्याने त्यांच्या घरातील व्यक्तीनींच मतदानाचा हक्क अनेक ठिकाणी बजावल्याने, मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदानाची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीत अपक्षेप्रमाणे झालेले मतदान पहाता माधव काळभोर किटलीतून प्रकाश जगताप यांना चहा पाजणार की प्रकाश जगताप आपल्या कपबशीतील चहा माधव काळभोर पाजणार, याचीच चर्चा दिवसभर मतदान स्थळी रंगली होती.
मतदारांसह उमेदवारांनाही शहाळ्यांचा प्रसाद..
लोणी काळभोर, उरुळी कांचन व केसनंद या तीनही मतदार केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांना दिवसभर एका अपक्ष उमेदवाराने नारळ पाण्याचा गोड प्रसाद दिला. कारखान्याच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या संतोष पोट हरगुडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दिवसभर नारळ पाणी वाटले. यामुळे कारखान्यावर कोण निवडून येईल याची माहिती कोणाला नसली, तरी ऐन उन्हाळ्यात थंड नारळ पाणी मिळाल्याने, सर्वांनीच संतोष हरगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
गटनिहाय मतदानाची आकडेवारी
गट नंबर एक- 1837, गट नंबर दोन- 1890, गट नंबर तीन- 1860, गट नंबर चार- 1431, गट नंबर पाच- 2163 व गट नंबर सहा- 2238.