पुणे : क्रिकेट खेळत असताना बॉल अवघड जागेवर लागल्याने अकरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११, रा. लोहगाव) असे बॉल लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना लोहगाव मधील जगद्गुरु इंटरनॅशनल शाळेजवळील स्पोर्ट्स अॅकॅडमीमध्ये गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद विमानतळ पोलिस ठाण्यात झाली आहे.
विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहावीमध्ये शिकणारा शंभू हा शाळेला सुट्टया असल्याने गुरुवारी सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक बॉल अवघड जाग्याला लागला. त्या वेळी तो मैदानात खाली पडला. अचानक पडल्याने इतर मुलेही गोंधळून गेली. मुलांनी आरडाओरडा केल्याने खाली पडलेल्या शंभूला खासगी दवाखान्यात नेण्यात आले. शंभूची डॉक्टरांनी तपासणी केल्या नंतर मृत घोषित केले. शंभूचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शंभूच्या अचानक मृत्यूमुळे खांदवे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.