पुणे : कमांड हॉस्पिटल येथे भरती सुरू आहे. तुम्हाला नोकरी हवी असल्यास मी देतो, असे आमिष दाखवून नोकरी लावण्यासाठी ८ जणांकडून ११ लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा येथील दाम्पत्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत अनिशा साहिल खान (वय ५३, रा. खडीमशीन चौक, कोंढवा खुर्द, पुणे) यांनी मंगळवारी (ता. २३) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विनायक कडाले व त्याची पत्नी दीपाली कडाले (रा. गंगाधाम, लुल्लानगर कोंढवा रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक कडाले याने फिर्यादी यांच्याशी गोड बोलून ओळख केली. आरोपीने कमांड हॉस्पिटल येथे भरती सुरू असून, कमांडंट ओळखीचे असल्याचे सांगितले. तुमच्या नातेवाईकांना व परिचयाच्या लोकांना ३ लाख रुपये घेवून भरती करुन देतो असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी ८ जणांकडून पैसे घेऊन १३ लाख ५० हजार रुपये आरोपीला दिली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या नातेवाईकांना नोकरी लावली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी विनायक याने अडीच लाख रुपये परत करुन उर्वरीत रकमेचा चेक फिर्यादी यांना दिला. आरोपीने उर्वरित रक्कम परत न करता तसेच नोकरी न लावता फसवणूक केली.