लोणी काळभोर : तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका १६ वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १२) घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रणव बापूसाहेब सुर्वे (वय २१, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपी प्रणव हा गेल्या सहा महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करत होता. मुलीला अडवून तिला त्रास देत होता. तिच्या शाळेच्या आवारात जाऊन तो तिला धमकावत होता.
दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी मुलगी शेतातून घरी चालली होती. तेव्हा आरोपी प्रणवने तिला अडवून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रणवने केलेल्या या कृत्यामुळे मुलगी घाबरली होती. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीने शुक्रवारी राहत्या घरात किटकनाशक प्राशन केले. मुलगी अत्यवस्थ झाल्याने तिला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांनी चौकशी केल्यावर तिने आरोपी प्रणवच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी प्रणव सुर्वे याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.