पुणे : राज्यात दहावीच्या परीक्षांना आज शुक्रवारी (ता. 01) सुरूवात होत आहे. त्यामुळे सर्वत्र परीक्षेचे वातावरण बघायला मिळत आहे. त्यातच कॉपी मुक्त परिक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक देखील करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना काही नियम देखील पाळणे आवश्यक आहे.
यंदाचे दहावी बोर्डचे पेपर हे दोन सत्रात पार पाडणार आहेत. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता पेपर सुरू होतील. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे. यामुळे मंडळाकडून सांगण्यात आलंय की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून नये.
यंदा राज्यभरातून तब्बल 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे, 56 ट्रान्सजेंडर देखील 10 वी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 9 विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. 6 हजार 86 केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, कॉपी मुक्त परिक्षेसाठी राज्यभरात 271 भरारी पथक कार्यरत करण्यात आले आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांवर भेट देतील. जर कोणीही गैरप्रकार करताना आढळले तर यांच्यावर कारवाई करणार आहेत.