मंचर : गोवर्धन ब्रॅंड-पराग मिल्क फूड्स लि. दूध प्रकल्पाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. पराग मिल्क कंपनीचे बदनामी करणारे मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, प्रवीण पारधी यांच्या व खोटी माहिती प्रसारित करणा-या माध्यमांच्या विरोधात फौजदारी गुन्हा व 100 कोटी रुपये रक्कमेचा अब्रू नुकसान भरपाईचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पराग मिल्क चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय मिश्रा यांनी पत्रकाद्वारे दिली.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या दुधात अळ्या आढळून आल्याची तक्रार देवदत्त निकम, प्रवीण पारधी यांच्यासह काही व्यक्तींनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्याकडे केली होती.
याबाबत पराग मिल्क चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय मिश्रा म्हणाले, ‘‘आश्रम शाळेत टेट्रापॅक दुधाचे बॉक्स सुरक्षित व निर्जंतुक ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. परंतु, या घटनेत टेट्रापॅक दुधाचे बॉक्स कुरतडल्याचे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना आढळून आले. कुठल्याही अधिकाराशिवाय खंडणीच्या उद्देशाने तक्रारदाराने शासकीय वसतिगृहात प्रवेश केला. स्वतःच एखाद्या शासकीय अधिकाऱ्याप्रमाणे वर्तन करून चौकशी केली आहे.
या घटनेची माहिती व्हिडीओद्वारे प्रसारित केली. नियमानुसार सदर माहिती तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाला देऊन त्यांच्याकडून पाहणी किंवा पंचनामा करणे अपेक्षित होते. पण, तक्रारदारांची कृती कटकारस्थानाचा भाग आहे, असे वाटते. प्रकल्प अधिकाऱ्यांनी उघडलेल्या बॉक्समध्ये अळ्या आढळून आल्या नाहीत, पण खंडणीखोराने स्वतः उघडलेल्या बॉक्समध्ये अळ्या आढळून आल्या. या संपूर्ण संशयास्पद प्रकाराची राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी.’’
टेट्रापॅंकमध्ये विक्री केल्या जाणा-या दुधामध्ये सुरक्षित आणि भरपूर पोषक तत्त्वे असतात. उच्च तापमानावर दुध उष्ण केले जाते. त्यानंतर दुधाला थंड करुन टेट्रापॅंकमध्ये भरण्यात येते. टेट्रापॅंक हा सहा लेअरचा असतो. त्यामुळे यामध्ये ठेवलेले दूध आरोग्यदायी मानले जाते. तसेच यासंदर्भात जागतिक स्तरावर टेट्रापॅंकचे मानांकन आहे.
– संजय मिश्रा- वरिष्ठ उपाध्यक्ष, पराग मिल्क फूड्स कंपनी लिमिटेड