राजगुरूनगर, (पुणे) : पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील 100 भूमिपुत्र कीर्तनकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील 200 भजनी मंडळ व सामाजिक संस्थांना सतरंजी व पिण्याच्या पाण्याच्या जारचे वाटप सोमवारी (ता. 27) करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
संतोषनगर-भाम (ता. खेड) येथील साईकृपा मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कीर्तनकारांचा स्मृतिचिन्ह, संपूर्ण वारकरी उभा पोशाख, तुळशीचे रोपटे देऊन सन्मान केला जाणार आहे. 200 भजनी मंडळे व सामाजिक संस्थाना सतरंजी व पाणी पिण्याचे जारचे वाटपहि करण्यात येणार आहे.
यावेळी पंकज महाराज गावडे यांचे प्रवचन, दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान डॉ. ताराचंद कराळे यांचे श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट व पायोनियर हॉस्पिटल यांचे माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, आयोजित केले असून तालुक्यातील वारकर्यांनी व भजनी मंडळातील सदस्यांना शिबिराचा फायदा होणार आहे. कीर्तनकार यांचा सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच तालुक्यातील ज्येष्ठ व नवीन कीर्तनकार, महिला कीर्तनकार आणि बाल कीर्तनकार प्रथमच एकत्रित येत आहेत.
दरम्यान, समाजाला प्रबोधन करून योग्य दिशा देण्याचे काम कीर्तनकार करीत असतात. तालुक्यात पहिल्यांदा असा आगळावेगळा कार्यक्रम होत असून या भक्तिमय सोहळ्यासाठी वारकरी मंडळी व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे.