पुणे: बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेली दहा वर्षांची विशेष मुलगी गुरुवारी (दि. १५) सुखरूप सापडली. तिला तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बिबवेवाडी भागातील पापळ वस्ती परिसरात राहणारीही मुलगी बुधवारी (दि. १४) बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. तिच्या नातलगांनी खूप शोध घेतल्यानंतरही ती हाती लागली नव्हती. त्याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर, स्थानिक पोलिसांनी व शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी तिचा शोध जारी केला.
पोलिसांनी बिबवेवाडी, कात्रज परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता ही मुलगी कात्रज परिसरात असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी विबवेवाडी पोलीस ठाण्यास भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. गुन्हे शाखेच्या पथकांकडून गुरुवारी (दि. १५) दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रात्री ही मुलगी सापडली. विमनस्क अवस्थेमुळे ती भरकटली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मुलगी सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.