पुणे : पुणे शहरातील बोपोडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका ४० वर्षीय नराधम व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला एका पडक्या खोलीत घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी 40 वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार बोपोडी येथे 12 जुलै ते 18 जुलै यादरम्यान घडला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने खडकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून नागेश येरपल नेल्ल्यु (वय-40 रा. बोपोडी, मुळ रा. मद्रास (साऊथ इंडियन) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश हा पेंटरचे काम करत आहे. आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील त्याने तिला धमकावले आणि एका पडक्या खोलीत नेले. त्याठिकाणी नराधम आरोपीने मुलीसोबत अश्लील चाळे करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, आरोपी सतत त्रास देत असल्यामुळे पीडित मुलीने या प्रकाराबाबत आईला सांगितले. आईने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहा तासाच्या आत आरोपीला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.