योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यात १० वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दहिवडी गावच्या मांजरेवस्ती शिवारात शुक्रवारी २१ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यश शरद गायकवाड (वय-१०) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यश दुपारी घराच्या मागील बाजूस शौचास गेला होतं. त्यावेळी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. बराच वेळ झाला तरी यश येईना का? म्हणून यशच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली असता तेथील उसामध्ये विचित्र अवस्थेत यशचा मृतदेह आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, दहिवडी परिसरातील ग्रामस्थांचा मोठा उद्रेक झालेला असून. बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी वनविभाग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करत आहेत. तीन-चार दिवसांपूर्वीच पारोडी, इंगळेनगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. वेळोवेळी वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आलेली होती. तरीही वनविभागाने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. यास वन विभाग जबाबदार आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रथम दर्शनी हा बिबट्याचा हल्ला वाटत नाही. आम्ही ससून रुग्णालयात पीएम केलेला असून त्याचे रिपोर्ट येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील. त्यामुळे तूर्तास तरी हा बिबट्याचा हल्ला आहे, किंवा अन्य कोणत्या वन्य प्राण्याचा हल्ला आहे हे रिपोर्ट आल्यावरच कळेल.
– प्रताप जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर
बिबट्याला पकडण्यासाठी दहिवडी येथे पिंजरा लावावा, अशी मागणी वनविभागाला केली होती. याआधी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे खूप वेळा निदर्शनास आले होते. वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण रोखण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.
– जालिंदर पवार (पोलीस पाटील, दहिवडी)
शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीदेखील शेतात जावे लागते. यावर उपाय करणे गरजेचे आहे. बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले असून बिबट्याची दहशत अजून किती दिवस सहन करावी लागणार.
– शेतकरी