लोणी काळभोर: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाल्याने ही निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता. 20) 3 लाख 21 हजार 180 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान करून आपला हक्क बजावला आहे. या मतदारसंघात हवेली तालुक्यातील 10 गावात झालेले 1 लाखांहून अधिक मतदान आमदार ठरविण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना व हवेलीतील यशवंत सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने सद्यस्थितीत बंद आहेत. तसेच या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा शेतीपूरक जोडव्यवसाय असलेला दुग्धव्यवसायही अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या ऊस पट्ट्यातील मतदान हे ऊसाचं कांडं आणि दुधाचं भांडं या दोन मुद्द्यांभोवती फिरले आहे. या मुद्द्यांभोवती केंद्रित झालेले मतदान या निवडणुकीत विजयी आमदार ठरवणार आहे.
शिरूर-हवेली मतदारसंघात 4 लाख 66 हजार 42 मतदारांपैकी 3 लाख 21 हजार 180 मतदारांनी (एकूण 68.91 टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये हवेली तालुक्यातील 1 लाख 64 हजार 702 (65.19 टक्के) तर शिरूर तालुक्यात 1 लाख 56 हजार 478 मतदारांनी (73.32 टक्के) मतदान केले आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये हवेली तालुक्यातील वाघोली, पेरणे, लोणी कंद, केसनंद, कोलवडी-साष्टे, थेऊर, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व उरुळी कांचन या 10 गावांमधून तब्बल 1 लाख 10 हजाराहून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे या दहा गावांमधील मतदारांचा कौल शिरूर हवेलीचा आमदार ठरविण्यास निर्णायक ठरणार आहे.
शिरूर तालुक्यापेक्षा हवेली तालुक्यात 8224 जास्त मतदान झाले आहे. तसेच शिरूर-हवेली तालुक्यात झालेल्या मतदानापैकी महिला मतदारांची संख्या व नवमतदारांचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जाणार व कोणाला झटका देणार? यावर राजकीय जाणकारांनी उमेदवारांच्या विजयाची गणिते ठरविली आहेत. यामध्ये ‘तुतारी’ व ‘घड्याळ’ या दोन्ही बाजूंकडून विजयाचा गुलाल आपलाच असा दावा केला जात आहे.
शिरूर-हवेली मतदारसंघातून 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमवण्यासाठी उतरले होते. मात्र, मुख्य लढत ज्ञानेश्वर कटके व अशोक पवार यांच्यात झाली आहे. या निवडणुकीचा फैसला उद्या शनिवारी (ता.23) होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून रांजणगाव-कारेगाव-वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. ही मतमोजणी 20 फेऱ्यांमध्ये होणार असून पहिल्या 11 फेऱ्यांची मतमोजणी शिरूर तालुक्यातून सुरु होणार आहे. त्यानंतर हवेली तालुक्यातील 9 फेऱ्यांची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीसाठी 20 मिनिटांचा कालावधी लागणार असला तरी, शिरूर हवेलीचा अंतिम निकाल येण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
‘तुतारी’ व ‘घड्याळ’ समर्थकांचा विजयाचा दावा
शिरूर-हवेली मतदार संघात 3 लाख 21 हजार 180 मतदारांनी आपला हक्क बजावल्याने या मतदारसंघात आमदार अशोक पवार व माऊली कटके यांच्यात तगडी फाईट होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूने सर्वोच्च शक्तीचा वापर करत आपल्याकडे निर्णायक मते वळविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी साम, दाम, दंड व भेद अशी आयुधे वापरल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागले असून तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. जनतेच्या मनातील आमदार उद्या शनिवारी ठरणार आहे.
हवेलीतील 10 गावांची नावे व झालेले मतदान
वाघोली – 39583
उरुळी कांचन – 15707
लोणी काळभोर -14563
कदमवाकवस्ती – 12250
केसनंद – 8360
थेऊर – 5962
कोलवडी-साष्टे – 5804
पेरणे – 5071
लोणी कंद – 4895
कुंजीरवाडी – 4713