लोणी काळभोर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईत मुक्कामी असणार आहेत. म्हणून आंदोलनकर्त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने १० टन लाडूची बुंदी तयार करण्यात येत आहे, अशी माहिती लोणी काळभोरचे सरपंच तथा श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ मंदिरात मराठा आंदोलकांच्या जेवणासाठी बुंदी गुरुवारी (ता.२५) सकाळपासून तयार करण्यात येत आहे. ही बुंदी तयार करण्यासाठी १० आचारी व ५० ते ६० मजूर काम करत असल्याचेही सरपंच काळभोर यांनी सांगितले. यावेळी लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, शिवदास काळभोर, मिलिंद काळभोर, जयपाल काळभोर, बापूसाहेब काळभोर, ऋतिक काळभोर, आप्पासाहेब काळभोर, सचिन काळभोर, सतिश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना योगेश काळभोर म्हणाले की, सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना बुंदीचा शिधा मुंबईत जाऊन शुक्रवारी (ता.२६) वाटप करण्यात येणार आहे. हा शिधा ४ टेम्पोच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहे. याबरोबर सुमारे ५ हजार पाण्याच्या बाटल्या वाटल्या जाणार आहेत. याचा अन्नपदार्थाचा नक्कीच मराठा आंदोलकांना फायदा होईल. आणखी काही मदत लागली तरी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू. तसेच लवकरच या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढत आहेत. मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांसाठी रायगड सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी दुपारच्या जेवणाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते. त्यानंतर वाशी येथे मुक्कामी असणार आहे आणि २६ तारखेला वाशी ते मुंबई प्रवास करत आजाद मैदान गाठणार आहेत.
आर्थिक मदत गोळा करण्याचे काम सुरु
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी व मोर्चात सहभागी असलेल्या मराठा बांधवांना जीवनावश्यक उपयोगी व अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदत गोळा करण्याचे कार्य देखील सुरु आहे. यामध्ये कदमवाकवस्ती व लोणी काळभोरमधून ऑनलाईन माध्यमातून पाच लाख रुपये जमा झाले होते. या पैशांमधून बुंदी तयार करण्यात येत आहे.
लोणी काळभोर येथून उद्या पाठवण्यात येणार मदत
मुंबईकडे गेलेल्या मराठा बांधवांसाठी काळभोर कुटुंबियांच्या वतीने दहा टन बुंदी पाठवण्यात येणार आहे. ज्या बांधवांना मोर्चात सहभागी व्हायचे असेल, अशा सर्वांनी शुक्रवारी (दि.26) भक्ती शक्ती चौकातील अंबरनाथ मंदिर येथे साडेदहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेल्या गाड्या उद्या लोणी काळभोर येथून रवाना करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.