बारामती : बारामतीमधून मोठी अपडेट समोर येत आहे. देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून ला जाहीर झाला. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला. तर सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांकडून सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये चुरशीची लढत झाली होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळाली. बारामती लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. मात्र, सुप्रिया सुळे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. त्यांच्या या विजयानंतर अजित पवार गटातील राज्यभरातील काही आमदारांनी त्यांना मेसेज करून शुभेच्छा दिल्याने अजित पवार गटाचे दहा आमदार घरवापसी करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
अजित पवार गटाचे १० आमदार नाराज असून ते घरवापसी करणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघातील अजित पवार गटाच्या आमदारांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांना अनेक आमदारांनी शुभेच्छांचे मेसेज पाठवले. त्यासोबतचं अजित पवार गटाच्या १० आमदारांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.