लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत मागील 14 वर्षापासून वारंवार शारीरिक संबंध ठेवून १० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्कार व फसवुणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने शनिवारी 1 जून रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतिश दिलीप काळभोर (वय-36 रा. कुंजीरवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश काळभोर याचा आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी आणि महिलेची 2010 मध्ये ओळख झाली. त्या ओळखीतून आरोपी सतीशने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर वेगवेगळा बहाणा करून महिलेकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्य़ादी यांनी दिलेले १० लाख रुपये परत मागितले असता पैसे देण्यास नकार दिला. तसेच लग्न न करता फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.