संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील एकूण 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील एक वाटलूज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित 10 ग्रामपंचायतींचे मतदान रविवारी होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या. जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी आता पडद्यामागील घडामोडींना वेग आला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून या निवडणुकीचा प्रचार प्रत्येक उमेदवाराने केला आहे. अनेक ठिकाणी तर तीन तीन पॅनेल उभे करून उमेदवारांनी निवडणुकीत रंग भरला होता. ग्रामपंचायतीचा मतदारसंघ काही ठिकाणी छोटा तर काही ठिकाणी मोठा असल्याने बहुतेक उमदेवारांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावरच भर दिला. तर काहींनी शक्तीप्रदर्शन करून गावात आपलाच वट असल्याचे भासवण्याचेही प्रयत्न केले. काही उमदेवारांनी तर शेतात राहणाऱ्या मतदारांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेऊन मतदान करण्याचा आग्रह केला. काहींनी ट्रॅक्टरवर उभं राहून प्रचार केला. तर काहींनी बैलगाडीतून प्रचार केला. काहींनी पदयात्रेवर भर दिला. तर काहींच्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवारांचे बॅनर फाडले.
अनेक उमेदवारांनी पत्नी आणि मुलांना प्रचारात उतरवून महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. निवडून आल्यावर गावचा विकास कसा करणार? गावात कोणत्या समस्या आहेत आणि जुन्या सदस्यांनी काम न केल्यामुळे त्या कशा रखडल्या आहेत, हे अनेक उमेदवार मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला. अनेकांनी भावकीतील लोकांची भेट घेऊन मतदान करण्याची विनंती केली.
आता प्रचार संपल्याने आजपासून उद्या रात्री उशिरापर्यंत गावातील गट, मंडळ आणि तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी सेटिंग सुरू झाली आहे. त्यात या उमेदवारांना कितपत यश येते, हे निकालाच्या दिवशीच समजणार आहे. येत्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 07:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत मतदान होणार आहे.
पारगाव व केडगाव ग्रामपंचायतीकडे लक्ष
दौंड तालुक्यातील बहुचर्चित केडगाव व पारगाव या दोन ग्रामपंचायतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुका पातळीवरील नेते उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.