पुणे : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातून सुटका करून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच मागणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या लाचेच्या रकमेचा २५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यस्थाला रंगेहात पकडण्यात आले. तुषार बनकर (वय ३०, रा. आंबेगाव पठार) असे आरोपीचे नाव आहे.
संजय नरळे असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. फिर्यादीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ही कारवाई बुधवारी (दि.21) कात्रज परिसरातील सुखसागर नगर येथील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सायबर युनिट कडे फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे. संजय नरळे यांना सांगून मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तुषार बनकर याने संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
एसीबीच्या पथकाने 13 आणि 20 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. त्यावेळी आरोपी तुषार बनकर याने तक्रारदार यांच्याकडे फसवणुकीच्या प्रकरणात मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी पीएसआय संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम मोठी असल्याचे वाटते असेल तर टप्प्या टप्प्याने देण्यास सांगून लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपांची मागणी केली. त्यानुसार बुधवारी सुखसागर नगर चौकातील स्वामी समर्थ स्नॅक सेंटर जवळ पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये स्वीकारताना तुषार बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.