सागर जगदाळे
भिगवण : भिगवणपासून जवळच असणाऱ्या बिल्ड ग्राफिक कंपनीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी मार्च २०२३ मध्ये चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास भिगवण पोलीस करत होते. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त खबऱ्यांमार्फत आरोपीला अटक केली आहे. आरोपीने अन्य गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चालक प्रवीण शिवाजी माने (रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी त्यांच्या मालकीची यामाहा कंपनीची लाल रंगाची आर, एक्स हंड्रेड (एम. एच. ३ पी. ५६२१) दुचाकी लावली होती. मार्च २०२३ मध्ये अज्ञात चोरट्यांनी गाडीचे लॉक तोडून ही दुचाकी चोरली होती. याबाबतची फिर्याद गाडी मालकांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, भिगवण परिसरात दिवसेंदिवस गाडी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी लखन शहाजी शिंदे (वय २७ वर्षे, रा. भादलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने बारामती तालुका व अकलूज येथून मोटारसायकली चोरी केल्या व विकत घेतल्याचे सांगितले. गुन्ह्यातील चोरीस गेलेला जवळपास १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल काढून दिला आहे. तसेच त्यांच्याकडे अधिक विचापूस केली असता, त्यांनी आणखीन काही गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच त्याचे आणखी दोन साथीदार, आरोपी यांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण आनंद भोईटे, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, रणजीत मुळीक, अंकुश माने यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले करीत आहेत.