पुणे : पुण्यात व्यवसायासाठी ७९ लाख रुपयांचे कर्ज पुरवून त्या बदल्यात १ कोटी ८० लाख घेऊनही एका व्यक्तीला शिवीगाळ, तसेच वेळेवर पैसे पोहचले नाही, तर हात-पाय तोडण्याचीही धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी बेकायदेशीर सावकारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशाल रत्नाकर हेगडे, उषा विनायक हेगडे आणि रत्नाकर हेगडे (रा. सदाशिव हाईट्स, भन्साळी कॅम्पसजवळ, वडगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत सुनीतकुमार सचिंद्रनाथ महता (४३, रा. निवास उडा, पौडवाल रोड, लोहगाव मूळ रा. मेधनापूर, पश्चिम बंगाल) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीतकुमार महता हे मूळचे पश्चिम बंगालमधील असून, ते लोहगाव परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा पीटी इंडस्ट्रीज नावाने निर्यात सुविधा पुरविण्याचा व्यवसाय आहे. मे २०१९ मध्ये ते वडगाव बुद्रुकमध्ये चौकात चहा पित असताना त्यांना तेथे विशाल ऊर्फ विनायक हेगडे भेटला. तेथे त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्याला व्यवसायासाठी भांडवलाची गरज असल्याचे हे विशालला समजले.
त्याने मी तुम्हाला कर्ज मंजूर करून देतो त्यासाठी कोरे धनादेश द्यावे लागतील व रकमेवर पाच टक्के व्याज व प्रोसेसिंग फी लागेल असे सांगितले. त्यानंतर जून २०१९ मध्ये २५ हजार रुपये प्रोसेसिंग फी म्हणून घेतले. त्यानंतर जून २०१९ ते जून २०२३ दरम्यान महता यांना ७९ लाख रुपये कर्ज स्वरूपात दिले.
मात्र, हे कर्ज मिळाल्यानंतर थोडा उशीर झाला तर विशालकडून शिवीगाळ केली जात होती. तसेच वेळेवर पैसे पोहचले नाही, तर हात-पाय तोडण्याचीही धमकी दिली जात होती. तसेच याप्रकरणात १ कोटी ८० लाख रुपये ऑनलाइन दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.