पुणे : पुणे जिल्ह्याला चालू वर्षी २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतून ड्रोन खरेदीसाठी १ कोटी १२ लाख ५४ हजार रुपयांइतके अनुदान मंजूर केले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करण्यात येणाऱ्या खते आणि औषधांचा योग्य वापर आणि पिकांना उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे.
खर्चातही बचत होत असल्यामुळे केंद्र सरकारनेही यांत्रिकीकरण उपअभियानातून ड्रोनसाठी अनुदान दिले आहे. ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइनद्वारे वैयक्तिक अर्ज करावेत. त्यामध्ये लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. एका ड्रोनची किंमत सुमारे १०.१५ लाख रुपये ते १०.४८ लाख रुपयांदरम्यान आहे. किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त चार लाख रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल ते अनुदान दिले जाते. ड्रोन खरेदी कृषी विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या पुरवठादाराकडून करावयाची असल्याचेही कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले आहे.