पुणे : शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्राव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पती- पत्नी, मुलगा व एका मुलीचा समावेश असून मुंढवा केशवनगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिपक थोटे (वय- ५९), इंदू दिपक थोटे (वय- ४५) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय- २४) मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय- १७) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी थोटे हे केशवनगर परिसरात भाड्याने रहायला आले होते. गुरुवारी (ता. १४) रात्रीपासून थोटे घराचा दार उघडत नसल्याने शेजारी रहात असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा दरवाजा ठोठावला. थोटे दांपत्य दार उघडत नसल्याने शेजारी राहत असलेल्या काही नागरिकांनी त्यांचा दरवाजा उघडायचा प्रयत्न सुद्धा केला.
शेजारी राहणाऱ्या नागरिकांना संशय आल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला. त्यांना घरातील बेडरूम मध्ये ४ जणांचे मृतदेह आढळून आले. शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची सखोल माहिती घेत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.