लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी ०२ वर्षासाठी पुणे शहर तथा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
करण उर्फ सत्या बाळू पांढरे , वय-२२ रा. खंडोबा मंदिरा जवळ, देवाची उरुळी, ता. हवेली) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण पांढरे हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर दुखापत करणे, जखमी करणे, मारहाण, शिवीगाळ, सामाईक इरादा, दुखापत पोचविण्याच्या उद्देशाने अंगावर धावुन जाणे, दंगा करणे, बेकायदेशीर जमावात सामिल होणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी संबंधीत आरोपींना शहर व जिल्ह्यातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त बजरंग देसाई यांना पाठविला होता. त्यानुसार देसाई यांनी दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे सदर सराइतांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
सदरची कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे यांनी केली आहे.