यवत : बेकायदेशीर गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहू (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील सह्याद्री हॉटेलच्या परिसरातून सोमवारी (ता.९) अटक केली आहे. त्याच्याकडून ०२ गावठी पिस्टलासह सुमारे ७० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तुषार तात्या काळे (वय-२०, रा.वाळकी तालुका दौंड, जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरार आरोपींचे शोध होते. गस्त घालीत असताना पथकातील पोलीस हवालदार सचिन घाडगे यांना तुषार काळे हा राहू येथील सह्याद्री हॉटेल जवळ विनापरवाना बेकायदेशीर पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. या सापळ्यात आरोपी तुषार काळे अलगद अडकला.
दरम्यान, पोलिसांनी तुषार काळे याला ताब्यात घेऊन, त्याच्याजवळील काळ्या रंगाचे बॅगची झडती घेतली असता सदर बॅगमध्ये विनापरवाना व बेकायदेशीर २ गावठी पिस्टल असा सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी तुषार काळे यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अजय घुले, विजय कांचन, गुरू जाधव, धिरज जाधव आणि अक्षय सुपे यांच्या पथकाने केली आहे.