पुणे: पुण्यातील येरवडा तुरुंगात तीन कैद्यांचा मृत्यू झाला असून कैद्यांच्या कुटुंबीयांनी तुरुंगाबाहेर एकच आक्रोश करताना ठिय्या आंदोलन केले. यावेळी तुरुंग प्रशासनाच्या विरोधात घोषणा देताना निषेध नोंदविण्यात आला.
शाहरुख बाबू शेख (वय-29 रा. कोंढवा), संदेश अनिल गोंडेकर (वय-26 रा. डोणजे, हवेली), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय-32 रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत.
सिंहगड परिसरातील डोणजे गावचा रहिवासी असणाऱ्या संदेश अनिल गोंडेकर (वय २६, मुळ. रा. डोणजे, ता. हवेली, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला) याचा मृत्यू झाला आहे. खुनाच्या आरोपाखाली त्याला २०१८ साली जेरबंद करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.
मोलमजुरी करणारे त्याचे वडील अनिल गोंडेकर व धुण्याभांड्याची कामे करणारी आई कलावती गोंडेकर हे दोघेही दर शनिवारी येरवडा मध्यवर्ती कारागृहात मुलगा संदेश याला भेटण्यासाठी जात असत. २४ डिसेंबर रोजी वडील अनिल गोंडेकर यांचे मृत्युमुखी पडलेल्या संदेशशी शेवटचे बोलणे झाले होते.
प्रशासनाने आजारी असून देखील कैद्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना औषधे वेळेवर मिळत नव्हती, त्यामुळेच त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. मात्र, प्रशासनाचा हलगर्जीपणा आम्हाला नडला असून यामुळे आमचा माणूस कायस्वरुपी आमच्यातून निघून गेला असल्याचे मृत संदेशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.