राहुलकुमार अवचट
यवत : देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना यवत येथेही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.२, विद्या विकास मंदिर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व गावातील विविध शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर प्रभात फेरी शाळेच्या मैदानात पोचल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ चे ध्वजारोहण माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ चे ध्वजारोहण उपसरपंच सुभाष यादव तर विद्या विकास मंदिरचे ध्वजारोहण यवत गावचे प्रथम नागरिक सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची कवायत, संविधान प्रतिज्ञा देण्यात आली व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे यांनी केले.
यावेळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेजची मागणी केली तर २ वर्ग खोल्या मंजूर केल्याबद्दल ग्रामपंचायतचे आभार व्यक्त केले. विद्या विकासचे मुख्याध्यापक दादा मासाळ यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळा परिसर सुधारण्यासाठी मदत केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत यवतचे आजी-माजी सदस्य, ग्रामसेवक बबन चखाले, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक वृंद, आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.