लोणी-धामणी / राजू देवडे : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती आंबेगाव, पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी एक वडगावपीर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वंधत्व निदान व उपचार शिबिर आयोजित केले होते.
यावेळी येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे तपासणीसाठी आणली होती. या शिबिरामध्ये सर्व पशुंना जंत निर्मुलन व गोचिड निर्मूलन औषधी व खनिज मिश्रण देण्यात आले. तसेच लसीकरणाचे महत्व सांगण्यात आले. भाकड कालावधी कसा कमी करावा याबद्दल शिबीरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध योजना या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. पी. पानसरे, सरपंच उज्वला आदक, ग्रामपंचायत सदस्य रवि ढगे पाटील, सोमनाथ आदक, ॲड. अशोक पालेकर पाटील, पोलिस पाटील काळूराम पालेकर पाटील, योगेश करंडे, फकिरा दादाभाऊ आदक, बापू आदक, कर्मचारी बी. के. पानसरे व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.