लोणी काळभोर : एका ट्रक चालकाने व्हाट्सअपवर स्टेटस ठेऊन साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात बुधवारी (ता.15) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. एकुलत्या एका तरुण मुलाने आत्महत्या केल्याने लोणी काळभोर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा विष्णू उबाळे (वय – 26, रा. महात्मा फुले नगर, माळी मळा, लोणी काळभोर, ता.हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू उबाळे हे ट्रक चालक असून कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यांचा मोठा मुलगा कृष्णा हा सुद्धा ट्रक चालक म्हणून काम करतो. तर मुलीचा विवाह झाला असून तो सासरी नांदते.
दरम्यान, कृष्णा उबाळे हा दुपारी बरा वाजण्याच्या सुमारास खोलीचा दरवाजा बंद करून बसला होता. सायंकाळचे सात वाजले तरी मुलगा दार उघडत नसल्याने वडील विष्णू उबाळे यांनी दरवाजा वाजविला. परंतु, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर विष्णु उबाळे यांनी नागरिकांच्या साहाय्याने खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा मुलगा कृष्णा हा साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन फॅनच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कृष्णा उबाळे यांना खाली उतरवले. व पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपासणी काळभोर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, कृष्णा उबाळे याने आत्महत्या करण्यापूर्वी बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोबाईल वर स्टेटस ठेवले होते. आणि त्यामध्ये ‘माँ आपका लाडला कभी भी दुनिया छोड सकता है!’ अशी व्हिडिओ क्लिप स्टेटसवर ठेवली आहे.