पुण्यातील सभेत घणाघात : मोदी यांच्यानंतर भाजपाचा चेहरा कोण ? आंबेडकर यांचा सवाल..!!
खडकवासला, पुणे : भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा करत आहे. २०२४ मध्ये काय २०२९ मध्ये देखील तुम्हीच सत्तेत येणार. कारण त्यापूर्वी तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकणार. त्यामुळे तुम्हाला विरोध करण्यासाठी कोण असणार..?? त्यामुळेच २०२४ मध्ये भाजप आणि आरएसएसचे सरकार येवू देवू नका. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
खडकवासला येथील वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. शिवसेनेसोबत युती केल्यापासून प्रकाश आंबेडकर हे जास्त आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना त्यांनी आज मोठे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सध्या नरेंद्र मोदी हे भाजपाचा चेहरा आहेत. मोदी यांच्या नंतर कोण जो देशाचे नेतृत्व करू शकेल असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. त्याबरोबरच काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीत, दक्षिणेत किंवा उत्तरेत एकही व्यक्ती राहिली नाही, की जी बाहेर जावून नेतृत्व करू शकेल, असे म्हणताना त्यांनी इतर पक्षांना देखील फैलावर घेतले.
ते पुढे म्हणाले, ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या लोकांना धाक आहे. त्यामुळेच सगळे यांना मुजरा करत हात जोडत आहेत. तुम्ही त्यांना दोन वेळेस पंतप्रधान केले. मात्र, आता २००४ साली गुजरात दंगलीच्या वेळेचे चरित्र लोकांसमोर येवू नये म्हणून त्यांनी बीबीसीचा माहितीपट दाखविणाऱ्याना अटक करत आहेत. हा माहितीपट दाखविला तर आपली सत्ता जाईल म्हणून त्यावर बंदी आणण्यात आली असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.