पुणे : सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. नर्मदे हर हर… च्या निनादात तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला.
त्याचवेळी दत्तचरणी प्रत्येक भाविक मनोभावे नतमस्तक होत होता. दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात करण्यात आले होते.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, इंदौर येथील योगाभ्यानंद माधवनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त संजय नामजोशी, त्रिपदी परिवार पुणे शाखेचे हरि मुस्तिकर, नागपूर शाखेचे राजीव हिंगवे व मुंबई शाखेचे आण्णा वडनेरकर आदी उपस्थित होते.
तसेच अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे व्यासपीठावर उपस्थित होते. दत्तमंदिर उत्सवाचे यंदा १२६ वे वर्ष असून दत्तजयंती उत्सवाचा प्रारंभ स्तोत्र पठणाने झाला. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
उत्सवांतर्गत मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत भजन आणि सायंकाळी ५ ते १० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.