हैदराबाद : येथे झालेल्या मानाच्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने हरियाणाच्या सोमाविर याला ४-० गुणांनी पराभूत करताना हिंदकेसरी किताब पटकावला.
अखिल भारतीय ॲमेच्युअर रेसलिंग फेडरेशन यांच्या वतीने हैदराबाद येथे हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजित कटके समोर हरियाणाच्या सोमविरचे आव्हान होते. हे आव्हान यशस्वीपणे परतून लावताना अभिजीतने हिंदकेसरी किताब पटकावताना आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेत भारतातील शेकडो मल्ल सहभागी झाले होते. या चार दिवसांच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हरियाणाच्या सोमविरने ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला पराभूत करताना अंतिम फेरीत धडक मारली होती. दुसऱ्या फेरीत अभिजित कटकेला पुढची चाल मिळाल्याने तो थेट अंतिम फेरीत दाखल झाला.
अंतिम फेरीत अभिजित कटकेने शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टींची सांगड घालताना ४ गुणांची कमाई केली. आणि तेच गुण सोमविरच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले.
अभिजित कटकेने २०१७ साली महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्रातील सर्वोच किताब पटकावला होता. त्याबरोबरीने त्याने दोन वेळा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत प्रवेश केला. मात्र, विजयाने त्याला हुलकावणी दिली होती. यापूर्वी २०१३ साली अमोल बराटेने हिंदकेसरी हा किताब पटकावला होता.