हनुमंत चिकणे : उरुळी कांचन
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत तीन वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
विकास सुरेंद्र (वय-३५, रा. रायपुर, छत्तीसगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अपघातात दोन कंटेनर व एक चारचाकी गाडी तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावर एलाईट चौक व तळवडी चौक या दोन्ही चौकांच्या मध्ये एक कंटेनर हा बिघाड झाल्याने मध्यरात्री थांबला होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विकास सुरेंद्र हा कंटेनर घेऊन पुण्याच्या बाजूने निघाला असताना अचानकपणे महामार्गावर थांबलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात कंटेनरचा पुढील भाग हा चक्काचूर झाला होता.
या धडकेत सदरील कंटेनर हा दुभाजकावरून सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर आला. त्याचवेळी सोलापूरच्या दिशेने उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीला जाऊन हा कंटेनर धडकला. यामध्ये चारचाकी गाडीचे व कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कंटेनरचा चालक विकास सुरेंद्र हा निपचित पडल्याचे दिसून आला.
सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून विकासला तात्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, पाच मिनिटाच्या अंतरावर लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्र असून तरीही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी न नसल्याने तब्बल अर्धा तास या अपघात ग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी वाहने व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे पोलिसांकडून तत्काळ मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.