यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत (ता. दौंड) येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला दुचाकीने धडक दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.२०) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक जागीच ठार झाला होता. तर दोन गंभीर जखमी झाले होते. या जखमीमधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्रज्वल संतोष शेळके असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. केडगाव येथील एक हसतमुख तरुण, कायम नवीन काहीतरी करायचे या जिद्दीने नवनवीन उपक्रम राबविण्याकडे कल असलेला प्रज्वल शेळके याचा अपघाती मृत्यू झाल्याने दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवत येथे दुचाकीवर जात असलेल्या प्रज्वल शेळके आणि अचानक महामार्ग ओलांडणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा अपघात झाला. या अपघातामध्ये तो अज्ञात व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडला तर प्रज्वल शेळके याला यात गंभीर मार लागला. तर प्रज्वल सोबत असणारा विवेक बारवकर हाही या अपघातामध्ये जखमी झाला मात्र त्यास गंभीर दुखापत झाली नसल्याने यवत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या अपघातात प्रज्वल हा गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्याला इजा झाली होती. त्याला तातडीने लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रज्वलला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र त्याची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली.
प्रज्वल शेळके हा दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संतोष उर्फ महेंद्र शेळके यांचा मुलगा आहे. प्रज्वलने त्याच्या हसमुख स्वभावाने मोठा मित्र परिवार कमावला होता. त्याच्या अपघाताची बातमी केडगावमध्ये समजताच अनेकांनी दवाखाण्याकडे धाव घेत एकच गर्दी केली होती. त्याच्या मृत्यूच्या खबरीने मात्र केडगाव, 22 फाटा, सोडनवर वस्तीवर शोककळा पसरली आहे.