पुणे : पुण्यात ‘डबल डेकर’ बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून गुरुवारी झालेल्या पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. यानूसार पहिल्या टप्प्यात २० इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते. तर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष ओमप्रकाश बकोरीया, सह व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पवार – पोतदार यांच्यासह पीएमपीएलचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. बैठकीत डबल डेकर बस खरेदी, विनातिकीट प्रवास करणार्यांना आकारण्यात येणारा दंड, ई – कॅब खरेदी आदींबाबत चर्चा झाली.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात प्रवासी वाहतूक सेवा देणार्या पीएमपीएलच्या ताफ्यात २ हजारहून अधिक बसेस आहेत. यात भाडेतत्वावरील आणि पीएमपीएलच्या स्वमालकीच्या बसेसचा समावेश आहे.
शहराची वाढती लोकसंख्या पाहता या बसची संख्या वाढविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. यातच पर्यावरणपुरक वाहतूकीसाठी मागील काही वर्षांपासून पीएमपीएल ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. याच अनुषंगाने आता पीएमपीएलच्या ताफ्यात मुंबईच्या धर्तीवर ‘डबल डेकर’ बसचा समावेश होणार आहे.