लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. ११) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चिंतामणी नगर, थेऊर परिसरात आयोजित करण्यात आली आहे. शासन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
सभासदांच्या विशेष सर्वसाधारण सभेपुढे कारखाना २०११ पासून बंद अवस्थेत असल्याने तो चालू करणेबाबत निर्णय घेणे , कारखान्याची निवडणूक घेण्यासंदर्भात निर्णय घेणे, सभासदांची वारस नोंद करणे, भाग हस्तांतरीत करणे , कारखान्याचा आसवणी प्रकल्प, पेट्रोल पंप, शाळा, गोडाऊन व इतर मालमत्ता भाड्याने देऊ करण्यासाठी निर्णय घेणे, कारखान्यावरील दाखल दावे तसेच न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेणे तसेच कारखान्याचा मालमत्तेवर झालेली अतिक्रमणांविरोधात निर्णय घेणे या विषय पत्रिकेवरील विषयांची परवानगी सभेची घेण्यात येणार आहे.
गेली ११ वर्षापासून बंद आवस्थेत असलेल्या या कारखान्याची सर्वसाधारण सभेत परवानगी घेऊन, ही संस्था भाडेतत्त्वावर अथवा अन्य वित्तीय संस्थांची सहाय्यता घेऊन सुरू करणेबाबत सभासदांची परवानगी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या संस्थेविषयी शासन धोरणांची माहिती सभासदांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी च्या विषयांवर काय चर्चा होणार म्हणून सभेच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेली ११ वर्ष कारखाना बंद आवस्थेत असताना ५ वी सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर होत आहे.