कवठे येमाई / अमिन मुलाणी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. या निषेधार्थ सविंदणे (ता.शिरूर) गावाने बंद पुकारला असून, स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. या आंदोलनास ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती.
मात्र, ते उपोषणावर ठाम होते. याचवेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर, स्त्रियांवर, लहान मुलांवर तसेच वृद्धांवर लाठीचार्ज केला. यामुळे गावातील तरुणांनी एकत्रित येऊन सरकारच्या निषेधार्थ गाव बंद पुकारल्याचे सरपंच शुभांगी पडवळ यांनी सांगितले.
शाळा, कॉलेज, दवाखाने, मेडिकल वगळता सर्वकाही बंद होते. तसेच छोट्या-मोठ्या दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.