केडगाव / गणेश सुळ : दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे व नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता येथील प्रमुख रमेश थोरात व राहुल कुल या दोन गटातील कार्यकर्त्यांच्या मागण्या सुद्धा जोर धरू लागल्या आहेत.
तालुक्यातील अकरा ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्ते वेळ मिळेल तसे आपल्या वरिष्ठ नेतेमंडळींना आपली शिष्टमंडळे घेऊन आपले वर्चस्व सिद्ध करत आहेत. यावेळी रमेश थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ‘मेळ’ घालावा असे काही कार्यकर्ते सुचवत आहेत. तर राहुल कुल यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे अशीच मागणी करत आहेत. दौंड शहराप्रमाणे केडगावमध्ये देखील लोकवस्तीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वांचे लक्ष केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीने वेधून घेतले आहे. कारण उद्यापासून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
केडगाव येथील सरपंचपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सरपंचपदाला इच्छुकांची यादीही मोठी असल्याचे समोर येत आहे. जो तो आपल्या कुटुंबातून महिला उमेदवार देण्यासाठी सल्लामसलत करत आहे. त्यामुळे यामध्ये आपल्या नेतेमंडळींनी लक्ष देऊन यांच्यामध्ये मेळ घालावा अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. सध्या सरपंचपदासाठी इच्छुकांची मोठी यादी असल्याचे दिसत असून, यामध्ये प्रामुख्याने शेळके, भोसले, होळकर, देशमुख आणखी काही आडनावातील विविध उमेदवारांचा यात समावेश असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे दादा गटात व आप्पा गटात यातील इच्छुक उमेदवारांचा विचार केला जाणार की ऐनवेळी वेगळाच उमेदवार दिला जाणार यावर मोठी चर्चा सुरु आहे.
…तर गटाची ताकद वाढेल
दोन्ही गटाकडून केडगाव स्टेशनमधून सरपंच उमेदवाराचा विचार व्हावा. कारण प्रामुख्याने केडगाव स्टेशन हा सर्वात मोठा वार्ड असून, येथील मतदार संख्या सर्वात जास्त आहे. येथील उमेदवार दिल्यास केडगाव स्टेशन येथील मतदार त्या उमेदवाराला जास्त पसंती देतील, अशी मागणी या कार्यकर्त्यांची असल्याचे दिसत आहे. दोन्ही गटांनी आपापल्या कार्यकर्त्यांमध्ये मेळ घातल्यास गटाची ताकद वाढणार यात शंकाच नाही, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.