पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभमीवर शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. देशातील यंत्रणेचा वापर नेत्यांचा विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही केला जात नव्हता. ईडी, सीबीआय किंवा अन्य यंत्रणांचा विरोधी नेत्यांना दाबण्यासाठी केला जात आहे. यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. कर्नाटकातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पण, कोर्टाने काँग्रेसचे डीके शिवकुमार यांची निर्दोष सुटका केली. यातून स्पष्ट होतंय की, ईडीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. गेल्या ११ वर्षांमध्ये ईडीने १४१ नेत्यांची चौकशी केली. त्यातील ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील होते. तसेच ११५ नेत्यांवर कारवाई झाली ते सगळे बिगरभाजपचे होते. ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात अनिल देशमुखांवरही कारवाई करण्यात आली. आता रोहित पवारांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. साखर कारखाना विकायला सरकार आणि बँकेने काढला होता. ज्याने जास्त बोली लावली त्याला कारखाना देण्यात आला. या प्रकरणात जाणूनबुजून एका सक्रीय कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.
निवडणूक आयोग १५, १६ किंवा १७ तारखेला कार्यक्रम जाहीर करेल अशी शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या एका सदस्याने राजीनामा दिला. त्याची कारणमीमांसा जाहीर केली नाही. त्यामुळे आम्हाला निवडणूक यंत्रणेबाबत काळजी वाटते, असेही शरद पवार म्हणाले.
ईडीची पोलखोल!
सक्तवसुली संचालनालयाच्या ५ हजार ९०६ कारवायांपैकी केवळ २५ कारवायांचा निर्णय झाला आहे. गेल्या ११ वर्षांमध्ये ईडीने १४१ नेत्यांची चौकशी केली. त्यातील ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील नेते होते. तसेच ११५ नेत्यांवर कारवाई झाली ते सगळे बिगरभाजपचे होते. यातील २४ काँग्रेसचे, १९ तृणमूल काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे १८ आहेत, शिवसेनेचे ८ आहेत. डीएमके ६, आरजेडी ५, समाजवादी पार्टी ५, सीपीएम ५, आप ३, नॅशनल कॉन्फरन्स २, मनसे १, पीडीपी २, एआयडीएमके १ आणि टीआरएस १ पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षातील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार, ११ माजी आमदार अशा नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकही भाजपचा नेता नाही.
काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या काळात ईडीने २६ जणांवर कारवाई केली आहे. या २४ मध्ये काँग्रेसचे पाच नेते आहेत, तर भाजपचे ३ नेते आहेत. यावरुन हे स्पष्ट होते की, यूपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती. ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष ठरला आहे. ईडी कधी कारवाई करणार, कोणावर करणार हे भाजप नेत्यांना माहिती असते, असेही शरद पवार म्हणाले.