पुणे : आजारी असलेल्या १४ वर्षीय मुलाला उपचारासाठी मुंबईला घेऊन निघालेली रुग्णवाहिका ट्रकवर पाठीमागून आदळल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाला असून, मुलाचे तिघे नातेवाईक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आंबेगाव बुद्रूक परिसरात जांभूळवाडी रस्त्यावरील दरी पुलाजवळ बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
किरण अंकुश अवताडे (रा. लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या १४ वर्षीय मुलाचे नाव आहे. अनिता अवताडे, अंकुश अवताडे आणि सुखदेव अवताडे असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. तर रुग्णवाहिका चालक सद्दाम सुतार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक नितीन मधुकर गवते (वय ३६, रा. भोंडवे चाळ, पुनावळे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवताडे कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहेत. त्यांनी किरणला सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अवताडे कुटुंबीय किरणला रुग्णवाहिकेतून मुंबईला घेऊन जात होते.
मध्यरात्री दरी पुलाजवळ रुग्णवाहिका चालकाने मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात किरणचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख करीत आहेत.