मुंबई : मनोज जरांगे यांच्या कालच्या आंदोलनावरून अजय महाराज बारसकरांनी हल्लाबोल केला आहे. काल घडलेला प्रकार तमाशा होता, नेतृत्व कसे नसावे हे काल दिसले. जरांगे यांच्या कालच्या भुमिकेमुळे त्यांच्यावर आज राजकीय लोकांकडून टीका होत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांचा अक्षरशः नटसम्राट म्हणून उल्लेख केला असल्याचे म्हणत बारसकरांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषेदत बारसकर बोलत आहेत.
नेतृत्व कसं नसावं हे काल दिसलं
पुढे बोलतांना बारसकर म्हणाले की, “माझ्यावर जरांगे पाटील यांनी आरोप केलेत. त्यांनी माफी मागितली पाहिजे होती. पण त्यांनी माफी मागितली नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर किंवा खंडन केले नाही. लोणावळा, वाशी येथे तुम्ही पारदर्शकता भंग केली. याउलट मला धमक्या शिव्या आणि जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या भूमिकेशी समाज सकारात्मक आहे. मी सत्य मांडत आहेत. वारंवार मी आक्षेप घेतले आणि प्रश्न विचारले याचे उत्तर दिले पाहिजे. माझ्यावर बलात्कार, पैसे घेतल्याचे आरोप केले. माझी नार्को टेस्ट करा, चौकशी करा मी जाहीर सांगतोय. काळाचा प्रकार तमाशा होता. नेतृत्व कसे नसावे हे काल दिसलं. माझ्याकडून आडमुठपणा झाला हे जरांगे यांनी काल कबूल केलं आहे, असे बारसकर म्हणाले.
आरक्षण मारुतीच्या मंदिरात मिळत नाही
मनोज जरांगे हे हेकलखोरपणा आणि आताताईपणा करतात हेच मी सांगितलं होतं. कालचे आंदोलन पाहिल्यास कोटीची लोकं काल दोनशेवर आली. सगळे नेते तुमच्यावर टीका करत आहेत. कालच्या भूमिकेमुळे समाजाची बदनामी होत आहे. फडणवीसांसोबतचा काल माझा एक फोटो ट्रोल केला. त्या फोटोत पुण्याची मंडळी आहेत. आम्ही का भेट घेतली होती, तर आरक्षणाच्या मागण्यासाठी भेटलो होतो. आरक्षण मारुतीच्या मंदिरात मिळत नाही, असे म्हणत बारसकर यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला.