Baramati Political News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस यापूर्वी बारामतीत धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा केला गेला आहे. शरद पवारांचा वाढदिवस म्हणजे बारामतीकरांसाठी दिवाळीच! दरवर्षी, चौकाचौकात साहेबांना शुभेच्छा दिल्याचे फलक झळकतात.
राष्ट्रवादी भवनात तालुक्यातील कार्यकर्त्यांची धावपळ सुरु असायची. शरद पवार यांचा वाढदिवस म्हटलं की महिनाभर कार्यक्रम चालू असायचे, यंदा मात्र पक्षातील फुटीनंतर दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाचा जल्लोष बारामतीत दिसला नाही. राष्ट्रवादी भवनासह शहरातील सर्व चौक सुने पडले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मात्र बारामतीतील सर्वच संस्था, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचे पसंत केले. यामुळे दरवर्षी धुमधडाक्यात साजरा केला जाणारा शरद पवार यांचा वाढदिवस यंदा जल्लोषात साजरा होताना दिसला नाही. ज्यांच्या नावामुळे या शहराची आणि तालुक्याची ओळख निर्माण झाली. त्यांच्याच बाबतीत असा अचानक बदल झाल्यामुळे सामान्य बारामतीकरांना यंदाचा वाढदिवस विचार करायला लावणारा ठरला आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. यानंतर राज्यभरातील काही पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवार आणि अजित पवार गट निवडले. मात्र बारामतीतील पदाधिकाऱ्यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं चित्र दिसत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा हा पहिलाच वाढदिवस. हा वाढदिवस जल्लोषात झाला नसल्याचं चित्र बारामती शहरासह तालुक्यात दिसून आलं.