राहुलकुमार अवचट
(Yavat News) यवत : मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने जायकाचा नदीसुधार प्रकल्प पुणे महानगर पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आला असून, त्याचे भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याविषयी आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात चर्चा केली होती.
काम पूर्ण करून सदर प्रकल्प तातडीने कार्यन्वित करण्यात यावा, जेणेकरून मुळा मुठा नदीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना प्रदूषण विरहीत पाणी उपलब्ध होईल, दिवसेंदिवस सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासत आहे, त्यादृष्टीने खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे ३ टिमसी पाण्याची बचत अपेक्षित असून सिंचनासाठी पाणी वाढवून मिळेल तसेच खडकवासला कालवा बंदिस्त झाल्यानंतर कालव्याच्या जागेचा उपयोग रस्ते, मेट्रो यांसारख्या विविध प्रकल्पांसाठी करता येऊन पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे.
तेव्हा खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित बोगद्याचे काम तातडीने सुरु करण्यात यावे तसेच खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या आदींच्या सुधारणेसाठी अशियन बँकेच्या सहकार्याने सुमारे १६०० कोटी रुपयांचा प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे त्यावर कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्या आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात लक्षवेधी चर्चेदरम्यान केल्या आहेत.
यावेळी आमदार कुल यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, जयाकाच्या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन देखील फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.