लोणी काळभोर : हडपसर परिसरातील महिलांना कंपनीच्या माध्यमातून गृहउद्योगाच्या संधी मिळाव्यात. व ज्या महिला सक्षम असतील, त्यांना नवीन उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य मिळावे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बीजेपी ओबीसीच्या पुणे शहर उपाध्यक्षा व स्मितसेवा फौंडेशनच्या अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी हडपसर येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना वरील निवेदन देण्यात आले. यावेळी स्मितसेवा फौंडेशनच्या सदस्या संगीता पाटील, मोहिनी शिंदे, निकिता निंगाले, नेहा निंगाले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे कि, रोजगार हि समस्या सद्या भेडसावत आहे. त्यामुळे घरातील दोघांनाही कमवावेच लागत आहे. महिलांना घर कामासोबत इतर कामे ही करावी लागत आहेत. महिलांना पूर्ण वेळ बाहेर काम करणे शक्य आहे, असे नाही. कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी पार पडत असताना, महिलांचा सर्व वेळ जात आहे. तसेच घरात लहान मुले असल्याने बाहेर पडता येत नाही.
यामुळे हडपसर भागातील गोर गरीब महिलांना घर बसल्या उद्योग मिळावा, पॅकिंग सारखी इतर कामे मिळावीत व उद्योगासाठी आर्थिक सहाय्य मिळावे. तसेच त्यांना त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावे.