राजस्थान : राजस्थानच्या राजकारणात दर पाच वर्षांनी सत्ता बदलाचा इतिहास आहे. या वेळी सत्तांतर होणार की नाही, हे आजच्या निकालातून स्पष्ट होईल. राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. एग्झिट पोलमध्ये भाजपाला झुकते माप मिळाले असले, तरी राजस्थानमध्ये अँटि इन्कम्बन्सीचा फायदा भाजपाला होतो की काँग्रेस सत्ता राखते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर
१९९३ पासून गेल्या ३० वर्षांत दर पाच वर्षांनी भाजप आणि काँग्रेस राज्यात सत्तेत आले आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १०० जागा जिंकता आल्या होत्या. त्यांना बहुमतासाठी फक्त एक जागा कमी पडली होती. बसपा आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर काँग्रेसने सत्ता स्थापन केली. तर भाजपला ७० जागा मिळाल्या होत्या. भाजपला त्याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत मोठा फटका बसला. २०१३ च्या निवडणुकीत भाजपला १६३ जागा होत्या. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते अशोक गहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री बनले. त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरीही केली. यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागले.
आमचा विजय निश्चित : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह
आमच्या विकासकामांमुळे, वरीष्ठ नेत्यांनी केलेल्या प्रचारसभांमुळे आमचा विजय राजस्थानमध्ये निश्चित आहे. आमच्या जाहीरनाम्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. तरुणांसाठी रोजगार, गॅस सिलेंडर, ५० लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा, गृहलक्ष्मी योजना या सगळ्या योजना तरुणांना आणि युवकांना प्राधान्य देणाऱ्या आहेत. इथे भाजपाचं काम नव्हतं. मोदीजी इथे येऊन अशा गोष्टी बोलायचे ज्या कदाचित देशाच्या पंतप्रधानांना शोभत नव्हत्या. १० वर्षं पंतप्रधान असूनही त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नव्हतं. इथले भाजपाचे नेते पूर्णपणे अपयशी होते.
काँग्रेसला विजयाचा विश्वास : बी. डी. कल्ला
बिकानेरमधून मी निवडून विधानसभेत जाणार, काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार! असा ठाम विश्वास कल्ला यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
कल्याणकारी योजना आणि जातीनिहाय सर्वेक्षणाचे आश्वासन हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वैशिष्टय आहे. शेतकरी आणि युवकांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. तरुणांसाठी १० लाख नोकऱ्या, तसेच पंचायत स्तरावर नोकरभरतीसाठी नवीन योजना राबवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भाजपाची आश्वासने कोणती?
मोफत स्कुटी, अँटी-रोमियो स्क्वॉड, पोलीस दलात ३३ टक्के आरक्षण, अशा आश्वासनांचा पाऊस भाजपने पाडला आहे.
या पार्श्वभूमीवर निकालाची उत्सुकता वाढली आहे. काही तासांत निकाल हाती येणार असून, मतदारांचा कौल कळणार आहे.