नागपूर : एक लाख कोटींचा मुंबई – दिल्ली एक्स्प्रेस वे दोन वर्षांत पूर्ण करू शकलो. मात्र आपल्याच घरासमोरील एक किलोमीटरचा रस्ता कित्येक वर्षांपासून पूर्ण होत नाही. पर्यावरणाच्या नावाखाली शासकीय अधिकारी विविध विकासकामांच्या फाईल्स अडवून ठेवत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचे आपल्या पत्नीपेक्षा या फाईल्सवर जास्त प्रेम असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर येथे खाण विषयांसंदर्भात आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आले होते. या कार्यक्रमात गडकरी यांनी वरील टोला शासकीय अधिकाऱ्यांना लगावला आहे. तसेच विकासकामांच्या फाईल्स अनेक वर्षे अडवून ठेवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे ऑडिट व्हायला हवे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खाणमंत्री दादा भुसे, आ. आशिष जयस्वाल उपस्थित होते.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, आपल्या केळीबाग येथील घरासमोरील रस्ता तयार करण्यासाठी ११ वर्षांत ३० बैठका घेतल्या, तरीदेखील हे काम पूर्ण होत नाही. पर्यावरणाच्या नावावर अनेक विकास प्रकल्प थांबवण्यात आले असल्याचेही गडकरी म्हणाले. विकासकामांच्या फाईल्सना परवानगी मिळण्यासाठीचा कालावधी निश्चित असावा, त्याचे डिजिटलायझेशन व्हावे, असेही ते म्हणाले.
आम्ही म्हणू तसे सरकार चालणार, असे जर वन व वेकोलीचे अधिकारी म्हणत असतील तर ते चालणार नाही, असे सांगत त्यांनी दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वन विभागाकडे अनेक फाईल्स प्रलंबित आहेत; त्या तत्काळ मार्गी लावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, काही आमदार, खासदार आपल्या प्रभावाने विकासकामे थांबवितात, असा टोलाही त्यांनी लोकप्रतिनिधींना लगावला. परिषद घेण्यापूर्वी त्याची टिप्पणी आम्हाला दिली असती तर यावर चांगली चर्चा झाली असती, काही निर्णय घेता आले असते, असे म्हणत त्यांनीआयोजकांनाही चिमटे घेतले.