Leaders in CM Race : छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभा जागांसाठी ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर दोन टप्यात मतदान झाले होते. आज मतमोजणी होत आहे. जवळजवळ निकाल स्पष्ट होत असून कलांनुसार, राज्यात भाजपने बहुमतांच्या आकड्याच्या पुढे जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासांमध्ये काँग्रेस आघाडीवर होते. नंतरच्या काही तासांत दोन्ही पक्षात काटे की टक्करपाहायला मिळाली. सध्याची आकडेवारी पाहता भाजप सत्तास्थापनेच्या जवळ पोहचले आहे. जर छत्तीसगडमध्ये भाजप जिंकले तर कोण होणार मुख्यमंत्री? याची जोरदार चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत मुख्यमंत्रीपदासाठी नेमके प्रबळ दावेदार कोण आहेत जाणून घेवूया. (Chhattisgarh Election)
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, छत्तीसगडमध्ये पु्न्हा काँग्रेस सरकार सत्तेत येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कलांनुसार, भाजपला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. छत्तीसगडमध्ये भाजपने सरकार स्थापन केल्यास मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला संधी मिळेल? असा प्रश्न उपस्थित होतोय.
छत्तीसगडमध्ये भाजपकडे चार मोठे चेहरे असून यामध्ये, माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव, खासदार विजय बघेल आणि माजी आयएएस अधिकारी ओपी चौधरी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तसेच, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सरोज पांडेय, माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल, माजी विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक, विरोधी पक्षनेता नारायण चंदेल, माजी मंत्री अजय चंद्राकर, युवा नेते ओपी चौधरी या नेत्यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते.