पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान केल्यानंतर लागेल महिला आयोगाने कारवाई करण्यासाठी पाऊले उचलत नोटीस पाठविली. मग असे असेल तर गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर आक्षेपार्ह विधान केले, त्यावेळी महिला आयोगाने काहीच कारवाई का केली नाही, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. या संदर्भात मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दोन वेळा फोन केला. परंतु त्यांनी फोन घेतला नसल्याचा दावा देखील अंधारे यांनी केला.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुळे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केल्यावर राष्ट्रावादी काँग्रेसने काल राज्यभर आंदोलने केले. मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात देखील कृषी मंत्र्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावर राज्य महिला आयोगाने देखील तातडीची पावले उचलत सत्तारांना थेट नोटीस धाडली. यामुळे त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. मग माझ्यावेळेस अशीच कारवाई गुलाबराव पाटील यांच्यावर का करण्यात आली नाही, त्यांना साधी नोटीस देखील आयोगाने पाठविली नाही, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.