नाशिक : आगामी काळातील निवडणुकी स्वबळावर लढायच्या आणि जिंकायच्याही असा निर्धार नाशिक येथे सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला आहे. यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षांच्या आव्हानांचाही सामना करावा लागणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे सुरू आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय सुरू आहे. यासाठी नियोजनाची जबाबदारी भाजपने आक्रमक करारी अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या मर्जीतील आमदार श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली.
भारतीय जनता पार्टीला (BJP) स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असून नाशिक येथे शनिवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजेंडा ठरविण्यात आला. भाजपाची (BJP) राज्य कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस नाशिकमध्ये सुरू आहे.
नवे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त मतदार पक्षाकडे कसे वळतील, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भाजपकडे कसा खेचता येतील आणि त्यातूनच आगामी निवडणुकीत विजय कसा साकार करता येईल, याचा आडाखा या बैठकीत मांडण्यात आला.
यासाठी काही जणांना महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यामध्ये विधानपरिषदेतील आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे महाविजय २०२४ करता प्रदेश संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली. भारतीय हे आता पुढील निवडणुकीत निवडणूक इन्चार्ज म्हणून काम पाहतील. निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी त्यांना आता त्यांच्या राजकीय अनुभवाचा पुरेपूर वापर करावा लागणार आहे.
कोण आहेत श्रीकांत भारतीय ?
श्रीकांत भारतीय अभ्यासू पदाधिकारी म्हणून त्यांची पक्षात इमेज आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना श्रीकांत भारतीय हे त्यांचे OSD होते. फडणवीसांच्या अतिशय जवळचे आणि मर्जीतले म्हणून श्रीकांत भारतीय यांची ओळख आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी श्रीकांत भारतीय भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. अतिशय आक्रमकतेने सेनेच्या अंगावर जाणारे म्हणूनही श्रीकांत भारतीय यांची ख्याती आहे. सध्या ते विधानपरिषदेतील आमदार आहेत.