Pune News : (इंदापूर )उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ते तरंगवाडी पर्यंतच्या १४ पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खडकवासल्याचे इंदापूर तालुक्यातील शेतीला खरीपाचे आवर्तन गुरुवारी (ता.२७) पासून सुरू होत आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. (Pune News)
मदनवाडी ते तरंगवाडी पर्यंतचे १४ पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार….
उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी मागणी केली होती. त्यानुसार देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी सूचना दिल्या. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याशी शेतीसाठीचे आवर्तन व पाझर तलाव भरून घेणे संदर्भात चर्चा केली. त्यानुसार खडकवासल्याचे इंदापूर तालुक्यातील शेतीसाठीचे आवर्तन हे टेल टू हेड पद्धतीने गुरुवारपासून सुरू होणार आहे. तसेच मदनवाडी ते तरंगवाडी पर्यंतचे १४ पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.(Pune News)
इंदापूर तालुक्यात मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, काळेवाडी, पळसदेव, लोणी देवकर, न्हावी, रुई, गागरगाव, बळपुडी, बिजवडी (वनगळी), वडापुरी, तरंगवाडी हे तलाव आहेत. तर इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, निरगुडे, पिंपळे, पोंधवडी, अकोले, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, डाळज, रुई, न्हावी, लोणी देवकर, बळपुडी, कौठळी, खामगळवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, गोखळी, तरंगवाडी आदी अनेक गावांमधील शेतीला खडकवासला कालव्यातून पाणी मिळते. (Pune News)
दरम्यान, इंदापूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना खडकवासला कालव्यातून उद्यापासून सुरू होणाऱ्या आवर्तनाचा फायदा होणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.