राहुलकुमार अवचट
दौंड : कुणबी दाखल्यांबाबत असलेल्या विविध प्रश्नांसाठी जय शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे व मराठा बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र दौंड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तुषार बोरकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
दौंड तालुक्यात सुमारे २० हजारांच्या आसपास कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्याची यादी ही गावनिहाय तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावी, कुणबी दाखले काढण्यासाठी येत असलेल्या जाचक अटी कमी कराव्यात, कुणबी दाखले काढण्यासाठी येणाऱ्या अडचणीमध्ये सुलभता आणावी, कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी तालुक्यातील सर्व सर्कल कार्यालयात आठवड्यातून एक दिवस शिबिर आयोजित करावे, अर्जदाराने अर्ज दिल्यानंतर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी कुणबी कागदपत्रांची यादी दौंड तहसील कार्यालयाने संकेत स्थळावर प्रसिध्द केलेली आहे त्यावरून पडताळणी करावी व ८ दिवसात अर्जदारास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
इतर वेगळ्या कागदपत्रांची मागणी करू नये, कुणबी दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा, गृह चौकशीसाठी नेमलेल्या समितीची मुदत एक वर्ष ठेवावी यांसह आदि कुणबी प्रमाणपत्र संदर्भात मागण्यांचे निवेदन जय शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे व मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार तुषार बोरकर , उपविभागीय अधिकारी, दौंड उपविभाग पोलीस यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात केलेल्या मागण्यांची त्वरीत दखल घेऊन कार्यवाही करावी. अन्यथा शुक्रवार, दि.१४ जून पासून तहसील कार्यालय दौंड येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे राजाभाऊ कदम, अण्णासाहेब दोरगे, मंगेश फडके, संजय शिंदे, कैलास शितोळे, अमित पवार, संजय पहाणे, पांडुरंग कुतवळ, सचिन जगताप, मच्छिंद्र काळभोर, वसीम शेख, मयूर सूर्यवंशी, अंबादास काळे, छबु ढवळे, सचिन बागल यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते