सागर घरत
करमाळा : करमाळा तालुक्यातील घरतवाडी गावाला जाण्यासाठी डांबरी रस्ता नाही. लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी एकजूट करून आगामी येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींना अचानक जाग आली.
लोकप्रतिनिधींनी मुरमीकरण व रस्ता दुरुस्तीसाठी ७ लाख ३५ हजार रक्कम मंजूर केली. त्याची निविदा प्रक्रिया ही प्रसिद्ध करण्यात आली.
आक्रमक भूमिका घेतलेल्या घरतवाडी ग्रामस्थांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना निविदा रद्द करण्याचे ग्रामस्थांच्या वतीने पत्रही देण्यात आले आहे.
घरतवाडी ग्रामस्थ हे डांबरी रस्त्यावरती ठाम आहेत. काही दिवसांपूर्वीच कुंभारगाव -घरतवाडी व कुंभारगाव करपडी हद्द रस्त्याची दयनीय अवस्थेची स्थिती आहे.
‘घराची कळा आंगण’ सांगते अशी स्थिती करमाळा तालुक्यातील गावांच्या दळणवळणाची असल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांपासून जीवघेणा प्रवास ग्रामस्थ, विद्यार्थी या रस्त्याने करत असून सुद्धा ही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना जाग आलेली दिसत नाही.
या अगोदरही अनेक वेळा आश्वासने देऊनही आश्वासनपूर्ती झालेली नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे अशा प्रकारची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा कठोर निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचे पत्र सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना देऊनही त्यांना जाग न आल्याचे चित्र दिसत आहे.
एकही प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी रस्त्याची वस्तुस्थिती पाहण्यासाठी फिरकले नाहीत अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. मतदान जवळ आल्यानंतर अनेक वेळा घराची उंबरटे झिजवणारे लोकप्रतिनिधी मतदान झाल्यानंतर पंचवार्षिक संपत आली, तरीही मतदारांकडे व गावकऱ्यांच्या समस्यांकडे डोकावून ही पाहत नाहीत .
त्यांना मतदारांची आठवण निवडणुका जवळ आल्यावरच होते, शोकांतिका घरतवाडी ग्रामस्थ मोठ्या आक्रमकतेने, तळमळीने व्यक्त करत आहेत.
लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची दखल घेऊन डांबरी रस्ता मंजूर करावा, नागरिकांचे होत असणारे हाल लक्षात घेऊन, त्यांच्या मागणीस डांबरी रस्ता पूर्ण करून कृतीतून न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकून, तीव्र आंदोलने करून निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात येणार असल्याची खंत घरतवाडी ग्रामस्थ करत आहेत.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील याकडे लक्ष दिले जात नाही. बहिष्काराचा इशारा देताच प्रशासनाने मुरुमीकरनाची निविदा काढून आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे.
जो पर्यंत डांबरी रस्ते होत नाही,तोपर्यंत आम्ही गावकरी देखील बहिष्कारावर ठाम आहोत, असे घरतवाडी सतिष घरत यांची भूमिका आहे.